पुस्तक परिचय : भारतीय संस्कृती भाग १

भारतीय संस्कृती

लेखक : प.पु.साने गुरुजी

कृष्णाष्टमी १८५९

२९ ऑगस्ट १९३७



      भारतीय संस्कृती हा शब्द जेव्हा आपण ऐकतो,तेव्हा या शब्दांचा अर्थ काय?

तर भारतीय संस्कृतीची आयुष्याकडे बघण्याची विशेष दृष्टी या पुस्तकात अतिशय सोप्या शब्दात मांडली आहे.ज्ञान-विज्ञानास हृदयाची जोड देऊन संसारात मधुरता पसरू पाहणारी ही संस्कृती आहे.

    खरतर पुस्तकाचे नाव वाचताना हे पुस्तक समजेल का असे वाटते,परंतु पुस्तक वाचायला सुरुवात केल्यानंतर असे वाटते कि साने गुरुजींनी किती सोप्या शब्दात आणि आजही लागू होणारी उदाहरणे देऊन भारतीय संस्कृती वाचकांपर्यंत पोचवली आहे.


अद्वैत  अधिष्ठान  :

अद्वैत म्हणजे माझ्यासारखाच दुसरा आहे ही भावना.
आपणास येणाऱ्या सुख-दुःखाच्या अनुभवावरून दुसऱ्याच्या सुख-दुःखाची कल्पना येणे म्हणजे अद्वैत
मला मन बुद्धी,हृदय आहे त्याप्रमाणे दुसऱ्यालाही असेल ही भावना म्हणजे अद्वैत
मला ज्या गोष्टींनी दु:ख होते ती मी दुसऱ्यांच्या बाबतीत करणार नाही म्हणजे अद्वैत.
ही सृष्टी आपणास अद्वैत शिकवत आहे,जसे मेघ सारे पाणी देऊन टाकतात,वृक्ष फळे देऊन टाकतात याप्रमाणे जे जे आहे ते सर्वांना देऊ.सर्व मिळून उपभोग घेऊ.
अद्वैत म्हणजे भारतीय संस्कृतीचा आत्मा.
उदा.: आपली स्वतःची चूक झाल्यावर समोरच्या व्यक्तीने आपल्याला कशी वागणूक द्यावी असे आपल्या मनात येते तसेच दुसऱ्या व्यक्तीची चूक झाल्यावर आपण वागावे.

वर्ण

वर्ण व्यवस्था याविषयी अनेक मते आहेत.परंतु अतिशय सोपा अर्थ वर्णाचा...
वर्ण म्हणजे रंग.आपला रंग कोणता?तर येथे त्वचेचा रंग अभिप्रेत नाही,तर देवाने कोणता रंग (गुणधर्म) देऊन मला पाठवले आहे?
कुहू करणे हा कोकिळेचा जीवनरंग आहे,मधुर सुगंध देणे हा गुलाबाचा जीवनरंग आहे.माझ्यातून कोणता रंग,कोणता गंध बाहेर पडणार?कोणत्या रंगाचा विकास मला करायचा आहे?
पूर्वी गाणाऱ्याचा मुलगा लहानपणापासून गाणे पहात,ऐकत असे,परंतु जर बीज असेल तर ते रुजेल,उगवेल.बीजच नसेल तर ते त्या कामात रमणार नाही.त्यामुळे आपल्या पाल्याचा वर्ण ओळखा आणि त्या वर्णाचा विकास करा.मुलाचे गुणधर्म कळल्यानंतर त्या गुणाचा विकास जेथे होईल,तेथे त्याला पाठवणे हे पालकांचे कर्तव्य ठरते.


बुद्धीचा महिमा

भारतीय संस्कृतीमध्ये अंधश्रद्धेला स्थान नाही.वेद हा पाया मानला जातो.परंतु वेद म्हणजे काय?वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान आहे.ज्ञान हा भारतीय संस्कृतीचा आधार आहे.
जीवनाला सुंदर करणारा प्रत्येक विचार म्हणजे वेद आहे.
ऋग्वेद,यजुर्वेद,सामवेद,अथर्ववेद एवढेच वेद नाहीत.भारतीय संस्कृती गगनाप्रमाणे विशाल व सागराप्रमाणे अपार आहे.
आपले आयुष्य आनंदी व उत्साही कसे राहील? हे आयुर्वेद सांगेल.समाजाचे रक्षण कसे करावे?हे धनुर्वेद सांगेल.समाजाची करमणूक कशी करावी?समाजाला दु:खाचा विसर कसा पडावा? हे ते गांधर्ववेद सांगेल.हे सारे वेदच आहेत.


एवं वदती पुस्तकम 

भारतीय संस्कृती या पुस्तकातील काही भाग मी आपल्यासमोर सादर केला आहे.

हे पुस्तक म्हणजे ज्ञानाचा सागर आहे.आपल्याच संस्कृतीचे अनेक पैलू उलगडून दाखवणारे असे हे पुस्तक आहे.

त्यामुळे पुढच्या भागात देखील पुस्तकाच्या ज्ञानरूपी गाभाऱ्यात आपण जाऊया..

धन्यवाद!



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा